बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सरकारच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात बेळगावातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट बंद करण्यासंदर्भात आवाज उठविण्याचे आश्वासन दिल्यामुळे भारतीय कृषक समाज राज्याध्यक्ष शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी आज शनिवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले. तथापि खाजगी भाजी मार्केट बंद करावे या मागणीसाठी एपीएमसी व्यापाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आजही कायम होते.
बेळगावात नव्याने सुरू करण्यात आलेले जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट बंद करावे या मागणीसाठी गेल्या आठवड्यापेक्षा अधिक काळापासून बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी येथे व्यापाऱ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना भारतीय कृषक समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी एपीएमसी आवारात आमरण उपोषण सुरू केले होते. जय किसान भाजीमार्केट बंद करावे या मागणीसाठी मोदगी यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये व्यापारी सतीश पाटील यांनी देखील सहभाग दर्शवला होता. मात्र सतीश पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गेल्या बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तथापि सिद्धगौडा मोदगी मात्र आपल्या उपोषणावर ठाम होते. गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषणास बसलेल्या मोदी यांनी पाण्याचा एक थेंब व अन्नाचे शीतही न घेतल्यामुळे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात होती.
याबाबतची माहिती मिळताच बेळगाव दौऱ्यावर असलेले केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आज शनिवारी सकाळी एपीएमसी आवारात आंदोलनस्थळी जाऊन सिद्धगौडा मोदगी आणि आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी शिवकुमार यांनी मोदगी यांची आस्थेने विचारपूस केली.
त्याचप्रमाणे उपस्थित आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांकडून त्यांची मागणी जाणून घेतली त्यावेळी व्यापाऱ्यांनी कशा गैरपद्धतीने जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी देण्यात आली आहे याची माहिती दिली त्याचप्रमाणे सदर भाजी मार्केटमुळे सरकारी अधिकृत भाजी मार्केटचे कसे नुकसान होत आहे हे देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तेंव्हा एकंदर माहिती जाणून घेऊन डी. के. शिवकुमार यांनी सरकारच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जय किसान भाजी मार्केट बंद करण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित करून निश्चितपणे न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. तसेच आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांना केली आणि त्यांना नारळ पाणी देऊ केले.
त्यांच्या विनंतीला मान देताना शहाळे पिऊन मोदगी यांनी आपले उपोषण मागे घेतले. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह आमदार चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस नेते राजू सेठ, विरणगौडा पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते. मोदगी यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले असले तरी जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट बंद करावे या मागणीसाठी एपीएमसी व्यापाऱ्यांनी छेडलेले आंदोलन मात्र सुरूच आहे.