बेळगाव शहरात अंमली पदार्थांचा व्यवसाय फोफावला असून पोलीस अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करून गैरधंद्याबरोबरच येत्या 8 दिवसात अंमली पदार्थ व्यवसायाला अंकुश घालावा, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगावच्या पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे.
सुवर्ण विधानसौधमध्ये काल शुक्रवारी झालेल्या केडीपी बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी उपरोक्त सूचना केली. बेळगाव शहरात मटका आणि जुगाराबरोबरच अंमली पदार्थांचा व्यवसाय फोफावतो आहे. जिल्ह्यातही हे गैरधंदे सुरू आहेत. तेंव्हा येत्या 8 दिवसात विशेष मोहीम राबवून गैर धंदे थोपवावे. मटका जुगार गांजा विक्रीवर आळा घालण्यात जर अपयश आले तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी सूचनाही जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठकीत केली.
केडीपी बैठकीमध्ये शहरातील गैरधंद्यांबद्दल झालेल्या चर्चेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरिष्ठ अधिकारी केडीपी बैठकीस उपस्थित होते.
आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मटका, जुगार विरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत गैरधंदे खपवून घेतले जाणार नाहीत. या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त डाॅ. बोरलिंगय्या यांनी बैठकीत सांगितले.