गोवावेस येथील महापालिकेच्या मालकीचे व्यापारी संकुल युद्धपातळीवर जमीनदोस्त केल्यास अनेक जणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन 400 -500 लोक रस्त्यावर येणार आहेत. तेंव्हा फेरविचार करून हे संकुल पाडण्याचा निर्णय रद्द केला जावा, अशी मागणी स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांनी केली आहे.
गोवावेस व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक स्थितीत पोचली असल्यामुळे संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात संकुलातील रहिवासी -वहिवाटदारांना नोटीस बजावण्यात आली असून जागा खाली करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अचानक बजावण्यात आलेल्या या नोटीसमुळे संतप्त झालेल्या दुकानदार व व्यावसायिकांनी आज शनिवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. 30 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत अचानक धोकादायक कशी बनवू शकते? असा सवाल करून यासंदर्भात योग्य चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी दुकानदार आणि व्यवसायिकांनी केली आहे.
गोवावेस व्यापारी संकुल जमीनदोस्त करण्याच्या निर्णयाबद्दल संकुलातील दुकानदार आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना एका व्यावसायिकाने सांगितले की, 1988 मध्ये बांधण्यात आलेली गोवावेस व्यापारी संकुलाची इमारत अद्यापही सुस्थितीत आहे. मात्र तरीही ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून जागा खाली करण्याच्या नोटिसा आम्हाला देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 55 दुकानदार आहेत. या सर्वांनी करारानुसार येत्या 5 मार्चपर्यंतचे भाडे वगैरे सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे. सदर इमारत पाडली जाऊ नये यासाठी यापूर्वी चार -पाच वेळा आम्ही महापालिका आयुक्तांना विनंती केली आहे. त्यांनी देखील बघूया काय करता येते का? ते असे सांगून आम्हाला दिलासा दिला होता. मात्र आता अचानक दुकान गाळे खाली करण्याच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
या संदर्भात आम्ही या भागाच्या आमदारांना भेटलो आहोत. त्यांनी महापालिका अधिकार्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. गोवावेस व्यापारी संकुलाच्या बाबतीत पुन्हा एकदा दुसरे मत (सेकंड ओपिनियन) आजमावले जावे. मोठ्या अभियांत्रिकी संस्थांमधील तज्ञांची मते घेतली जावीत. त्यानंतर सारासार विचार करून इमारत पाडण्याचा निर्णय घेतला जावा. या व्यापारी संकुलातील सर्वांच्या व्यवसाय -धंदाचा चांगला जम बसलेला आहे. त्यामुळे जर ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली तर जवळपास 400 -500 लोक रस्त्यावर येणार आहेत. तेंव्हा हा प्रकार टाळण्यासाठी इमारत पाडण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी आमची कळकळीची विनंती आहे, असे त्या व्यवसायिकांनी स्पष्ट केले.