हालगा (ता. जि. बेळगाव) येथील बालाजी स्पोर्ट्सतर्फे आयोजित बालाजी ट्रॉफी -2022 भव्य हाफपीच नाईट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सनसेट वॉरियर्स पिरनवाडी या संघाने हस्तगत करताना आकर्षक करंडकासह 50,001 रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे.
हालगा येथील भरतेश मैदानावर सदर स्पर्धा काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली. रात्री प्रकाशझोतात खेळविल्या गेलेल्या सदर मर्यादित 9 खेळाडू आणि 5 षटकांच्या हापपीच क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण भागातील मातब्बर संघांनी भाग घेतला होता. राष्ट्रगीताने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सनसेट वारियर्स पिरनवाडी संघाने प्रतिस्पर्धी गणेश जवळकर लायन्स पिरनवाडी संघाला पराभूत केले.
त्यामुळे गणेश जवळकर लायन्स संघाला उपविजेतेपदासह 25,001 रुपये आणि चषकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या दिमाखात मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे आहेत. अंतिम सामन्यातील सामनावीर -एम.डी. (सनसेट वॉरियर्स), मालिकावीर -दास (गणेश जवळकर स्पोर्ट्स), उत्कृष्ट फलंदाज -अमर (सनसेट वॉरियर्स), उत्कृष्ट गोलंदाज -एम.डी. (सनसेट वॉरियर्स उत्कृष्ट), यष्टीरक्षक -युवराज भोसले (सनसेट वारियर्स).
ही स्पर्धा बालाजी काँक्रीट्स हालगा, श्री शिवनेरी युवक मंडळ मर्गाई गल्ली हालगा आणि विश्व हिंदू परिषद -बजरंग दल, हालगा यांनी प्रायोजित केली होती. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पांडू बिळगोजी, प्रवीण संताजी, महेश देवलतकर, अविनाथ उपाध्ये, आप्पा देवलतकर, पिंटू सालगुडे आदींसह बालाजी स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.