हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, अशा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशा विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात केलेले अपील फेटाळून लावताना न्यायालयाने आज सोमवारी बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे.
हालगा -मच्छे बायपासच्या कामाला चौथ्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा पहिल्या दिवाणी न्यायालयात अपील होते. याबाबत 50 शेतकऱ्यांना आज सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आली होती. त्यामुळे आज सर्व शेतकरी आपले वकील ॲड. गोकाककर आणि ॲड. भावे यांच्यासमवेत न्यायालयात हजर होते. मात्र न्यायालयाने या नवीन दाव्यालाही कायमची स्थगिती दिली असून पुढील तारीख 28 मार्च 2022 ही दिली आहे.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री पाठवून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते.
त्या वेळी आंदोलनकर्तांना अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत आपला विरोध कायम ठेवत बायपास रस्ता कामाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर चौथ्या दिवाणी न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती देत ‘झिरो पॉइंट’ निश्चित झाल्याशिवाय शिवारातील पिकांना हात लावू नये असे अशी स्पष्ट सूचना केली होती.
सध्या काम पूर्णपणे बंद झाल्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात स्थगिती विरोधात अपील केले होते. मात्र आता हे अपील दखील न्यायालयाने फेटाळून लावून बायपासच्या कामाचा स्थगिती आदेश कायम ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.