बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेत जरी झाली असली तरी अद्याप शहरात मात्र सर्वत्र स्मार्ट सिटी योजनेचा खोळंबा उडाला आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीचे कामकाज अर्धवट स्थितीत असून नागरिक देखील वैतागले आहेत.बेळगावमध्ये स्मार्ट बसस्थानक, स्मार्ट रेल्वे स्थानक, याचप्रमाणे मध्यवर्ती बसस्थानकाच्या कायापालट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. बऱ्याच कालावधीपासून सुरु असलेले हे कामकाज अजूनही संथगतीने सुरु असून या बसस्थानकाच्या शुभारंभाची नागरिक आतुरतेने वाट पहात आहेत.
सीबीटीचे काम हे स्मार्टसिटी योजने अंतर्गत सुरु असून मुख्य बसस्थानकाचे कामकाज नाशिक येथील ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्य बसस्थानक आणि सीबीटीचे काम सुरू करण्यात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकाचे आतापर्यंत जवळपास ७५ टक्के काम झाले असून सीबीटीचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे.
या कामकाजासाठी दोन वर्षाचा कालावधी गृहीत धरण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप हे कामकाज अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनास येत आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या या कामकाजाचा प्रवाशांसह बसस्थानक प्रशासनालाही फटका बसला आहे.
ठेकेदाराने याचे काम ३१ मार्च २०२२ पूर्वी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अजून किमान सहा महिने तरी हे कामकाज लांबेल असे निदर्शनास येत आहे. सीबीटी बसस्थानकाच्या दुसर्या मजल्याच्या स्लॅबभरणीचे काम करण्यात आले असून यासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भूमिपूजनानंतर सुरुवातीच्या काळात या दोन्ही बसस्थानकाचे कामकाज धीम्या गतीने सुरू होते. त्यानंतर कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर हे कामकाज बंद पडले. मुख्य बसस्थानक आणि सीबीटी हे शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी हे कामकाज रात्रीच्या वेळीहि करण्यात आले. मुख्य बस्थानकाचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामकाज लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
सीबीटी बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी तळमजल्यामध्ये सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन येणार्या प्रवाशांना पार्किंग उपलब्ध होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी आणि प्रवाशांना ये-जा करणे सोयीचे हेणार आहे. मुख्य बसस्थानकाचे काम पूर्ण होण्यास किमान सहा महिने लागतील असा अंदाज असून सोयी सवलती आणि हायटेक मध्यवर्ती बसस्थानकाच्या शुभारंभाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.