सध्या सर्वत्र लग्नसराईचा मौसम आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या लग्नसमारंभादरम्यान बहुतांशी ठिकाणी डॉल्बीचा दणदणाट ऐकू येतो. आवाजमर्यादा आणि वेळ मर्यादा असूनही मध्यरात्रीपर्यंत हा दणदणाट आसपासच्या परिसरातील नागरिकांना सोसावा लागतो.
काही सुजाण नागरिक वेळीच पोलीस विभागाला यासंदर्भात माहिती देतात. आणि त्यानंतर पोलिसांकडून सदर डॉल्बीचा आवाज बंद करण्यात येतो. मात्र बेळगावमधील क्राईम विभागाच्या डीसीपी स्नेहा यांनी मात्र चक्क डॉल्बीचे वाहनच जप्त केल्याची घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात कल्लाप्पा यल्लाप्पा कातकर त्यांच्या घरी लग्नसोहळा असल्याकारणाने डॉल्बी लावण्यात आली होती. परंतु मध्यरात्र झाली तरी डॉल्बीचा दणदणाट काही कमी झाला नाही. याच परिसरापासून जवळ असलेल्या हनुमान नगर येथे डीसीपी स्नेहा या वास्तव्यास आहेत. डॉल्बीचा दणदणाट कमी न झाल्याने त्यांनी ही माहिती काकती पोलीस स्थानकाला कळवली.
तातडीने पीएसआय अविनाश यरगोप्प आणि इतर सहकाऱ्यांनी आंबेवाडी गाठून डॉल्बीचे वाहनच ताब्यात घेतले आहे.
कल्लाप्पा यल्लाप्पा काटकर आणि भाग्यनगर येथील डॉल्बी मालक रमेश मारुती पाटील यांच्यावर आयपीसी कलम, एम व्ही ऍक्ट तसेच कर्नाटक पोलीस कायदा २०२१ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे