बेळगाव: कर्नाटक सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात कटकारस्थान करताना दिसून येत आहे. बेळगावमध्ये अनेक ठिकाणी सुपीक जमिनींचे संपादन करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे.
हलगा – मच्छे बायपास संदर्भात देखील शेतकऱ्यांचा विरोध डावलून भूसंपादनाचा घाट घालण्यात आला आहे. आता यानंतर बोटॅनिक गार्डनसाठी पिकाऊ जमिनींचे भूसंपादन करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
सर्व्हे क्रमांक 590 मध्ये बोटॅनिक गार्डनसाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणातर्फे शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवाय बळ्ळारी नाल्यानजीक असणाऱ्या सुपीक जमिनिवरदेखील एका मोठ्या प्रोजेक्टचा घाट घालण्यात आला आहे.
‘जय जवान जय किसान’ चा नारा देत आजवर भारतात शेतकरी जगत आला आहे. मात्र विविध योजना, प्रकल्प यासाठी शेतकऱ्यांच्या उदारनिर्वाहावर पाय देऊन सुपीक जमीनी संपादित करण्याचा घाट सरकार सातत्याने राबवत आहे.
शेतकरी जगला तरच देश टिकेल हे प्रत्येकाने लक्षात घेऊन सुपीक जमिनी ऐवजी बंजारा जमिनीचा वापर करून प्रकल्प आणि योजना राबवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.