राकसकोप रोडवरील केईबी ऑफिससमोर असलेल्या अशोकनगर स्वराज्य कॉलनी या वसाहतीमध्ये रस्ते, गटारी आदी कोणत्याच नागरी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध नाहीत. झाडेझुडपे वाढलेले कच्चे रस्ते, अर्धवट बांधकाम झालेल्या गटारी आदींमुळे तेथील नागरिकांचे मोठे हाल होत असून लवकरात लवकर संबंधित सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
राकसकोप रोडवरील केईबी ऑफिससमोर असलेली अशोकनगर स्वराज्य कॉलनी ही वसाहत जवळपास पाच-सहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. व्यवसायिक विनोद राजाईकर, महेश बाळेकुंद्री आणि महेश कणबरकर यांच्या पुढाकाराने व्यवस्थित एनए लेआऊट करून केजीपीसह ही वसाहत निर्माण करण्यात आली. तथापि या वसाहतीतील चांगले रस्ते, गटारी, पाणी आदी नागरी सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी सध्या येथील रस्ते आणि गटारींची दुर्दशा झाली आहे. आजतागायत डांबराचा स्पर्शही न झालेल्या या ठिकाणच्या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्यावर अक्षरशः गवताचे रान उगवले आहे. परिणामी वाहनचालकांना विशेषकरून दुचाकी वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे एक प्रकारचे आव्हानच असते शिरस्त्याप्रमाणे या ठिकाणच्या गटारी सुद्धा व्यवस्थित बांधण्यात आलेल्या नाहीत.
पैसे घ्यायला लगेच येता मग आमची कामे का करत नाही? असा नागरी समस्यांसंदर्भात जाब विचारणाऱ्या नागरिकांना वसाहतीची निर्मिती करणाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे समजते. कंत्राटदाराला आम्ही 5 लाख रुपये दिले आहेत, तो लवकरच सर्व कांही व्यवस्थित करून देईल असे सांगून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात असल्याचे सांगण्यात आले. अशोकनगर स्वराज्य कॉलनी वसाहतीमध्ये पथदीपांची देखील सोय नव्हती. त्यासंदर्भातही तक्रार करून काहीच उपयोग होत नसल्याचे पाहून शेवटी स्थानिक नागरिकांनी स्वतःच या कामी पुढाकार घेतला.
त्यांनी आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर, सुळगा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आदींना भेटून वसाहतीमध्ये पथदीपांची सोय करून घेतली आहे. तथापि आता दिवसेंदिवस सदर वसाहतीतील नागरी सुविधांची समस्या अधिकच बिकट बनत चालली आहे तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.