बेळगाव लाईव्ह, विशेष : बेळगावच्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार दडले आहेत. अशा विविधांगी कलाकारांमुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जात आहे. बेळगावमधील अशीच एक तरुणी सध्या कलाक्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. शॉर्टफिल्म्स, वेबसिरीज, विविध प्रकारचे नृत्य, आणि प्रामुख्याने लावणी नृत्य इतकेच नाही तर कराटे सारखे स्वसंरक्षणाचे धडे गिरविणारी बेळगावची रिया रामलिंग पाटील सध्या अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे.
मूळचे खानापूर तालुक्यातील भाम्बार्डा – हलशी येथील रियाचे कुटुंब सध्या मच्छे येथे स्थायिक आहे. रियाचे वडील रामलिंग पाटील हे खाजगी कंपनीत तर कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून रियाची आई रुपाली पाटील यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळे आज रिया यशाच्या उत्तुंग शिखरावर भरारी मारत आहे. हेरवाडकर हायस्कुल येथे शालेय शिक्षण घेऊन त्यानंतर आरपीडी महाविद्यालयात पदवीपूर्व आणि जैन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणारी रिया आज अभिनय क्षेत्रातील विविध शिखरे पादाक्रांत करत आहे.
गेल्या सात वर्षांपासून रिया लावणीसह अनेक प्रकारचे नृत्य सादरीकरण करत आहे. नृत्य सादरीकरणात परीक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे रियाने अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. शालेय जीवनापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणारी रिया आज अनेक शॉर्ट फिल्म्स मध्ये झळकत आहे.
‘गर्लफ्रेंड नसताना…'(कव्हर अल्बम), ‘रक्षाबंधन’ (शॉर्टफिल्म), यामध्ये रियाने आपल्या अभिनयाची सुंदर झलक दर्शविली आहे. सध्या ‘गडरक्षक’ या शॉर्टफिल्म मध्ये तिने काम केले असून अल्पावधीतच हि शॉर्टफिल्म रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त काही कन्नड मालिकांमध्येही रियाने सहकलाकार म्हणून भूमिका बजाविली आहे. तिच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन एका मोठ्या चित्रपटात देखील ती प्रमुख भूमिका बजावत असून हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
सध्या नवनाथ मोहन ढमे दिग्दर्शित आणि प्रतिककुमार शहा निर्मित, ‘जुगलबंदी’ या वेब सिरीजमध्ये रिया प्रमुख भूमिकेत दिसणार असून अल्पावधीतच ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या वेबसिरीजचे चित्रण पुणे येथे सुरु असून सातारा येथे काही मराठी मालिकांसाठीही रियाने ऑडिशन दिली आहे. रियाच्या या सर्व कलागुणांना वाव देत तिला प्रोत्साहन देण्याचे कार्य प्रामुख्याने कै. परशराम नरसिंग पाटील यांनी केले. यासह तिचे विविध कलेचे शिक्षक किरण पवार, राहुल लोहार, सुनील नांगरे, अंजु होस्पेट, एम. कुमार अशा अनेक दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अभिनय क्षेत्रासह रियाला आयपीएस अधिकारी होण्याचीही इच्छा आहे. अभिनय आणि कला क्षेत्रासह आयपीएस अभ्यासक्रमाचे धडे घेऊन अधिकारी होण्याची रियाची सर्वस्वी इच्छा असल्याचे तिने सांगितले.
प्रत्येक क्षेत्रात काम करताना केवळ स्त्री म्हणून नाही तर एक सक्षम आणि खंबीर स्त्री म्हणून उभं राहताना तिने कराटेचेही प्रशिक्षण घेतले आहे. सध्या कराटेमध्ये ग्रीनबेल्ट मिळविणाऱ्या रियाने अभिनय क्षेत्रात केलेल्या दमदार पदार्पणामुळे कौतुकास पात्र ठरली आहे. बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणाऱ्या कु. रिया पाटील हिला पुढील वाटचालीसाठी ‘टीम बेळगाव लाईव्ह’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!