रशियाने अचानक यूक्रेनवर आक्रमण केल्यामुळे भारत सरकारने युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 24 तास सुरू राहणारी मदत वाहिनी अर्थात हेल्पलाइन सुरू केली आहे. युक्रेनमध्ये जवळपास 100 भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील अमोघ चौगुला आणि रायबाग तालुक्यातील प्रिया निडगुंदी अशी या विद्यार्थ्यांची नांवे असून दोघेही वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत.
या दोघांनीही भारतात माघारी परतण्यासाठी विमानाची तिकिटे आरक्षित केली आहेत. तथापि सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील नागरी हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आला आहे. युक्रेनची राजधानी किव येथील भारतीय दूतावासाने तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सल्ला देताना युक्रेन हवाई मार्ग बंद असल्यामुळे सर्व प्रमुख विमानसेवा रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगितले आहे.
त्याचप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर त्याबाबतची माहिती सर्व भारतीयांना दिली जाईल जेणेकरून ते देशाच्या पश्चिम भागात सुरक्षित स्थलांतरित होऊ शकतील, असे दूतावासाकडून कळविण्यात आले आहे.
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांसाठी अतिरिक्त हेल्पलाइन नंबर पुढीलप्रमाणे आहेत. +38 0997300428, +38 0997300483, +38 0933980327, +38 0635917881, +38 0935046170. दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे अमोघ चौगुला आणि प्रिया निडगुंदी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. अमोल आणि प्रिया यांनी आपण युक्रेनमध्ये सुरक्षित असल्याचे आपल्या घरच्यांना कळविले असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.