Sunday, January 5, 2025

/

बेळगाव शिवसेनेतर्फे मराठी भाषा दिन साजरा

 belgaum

बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज मराठी भाषा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन आणि साहित्यिक व पत्रकारांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आज सकाळी उत्साहात पार पडला.

मराठी भाषा दिनानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज सकाळी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे साहित्यिक गुणवंत पाटील यांनी पुष्पहार घालून शिवमूर्तीचे पूजन केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी या घोषणा दिल्या.

याप्रसंगी बोलताना गुणवंत पाटील म्हणाले की, मराठी भाषा दिन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील आत्म स्वाभिमानाचा दिवस आहे. वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा ही जगातील सातव्या क्रमांकाची भाषा म्हणून ओळखली जाते. जगभरात प्रत्येक देशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तेथपर्यंत मराठी भाषा पोहोचली आहे. मराठी भाषा मराठी माणसाने जगभर नेताना आपली संस्कृतीही नेली. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांचे नांव जगभर लोक आदराने घेतात. मराठी भूमीत, मराठी माणसात आणि मराठी भाषेच्या सानिध्यात आपला जन्म झाला त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत असे सांगून आपली भाषा मोठी आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने कांहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. घरातील लहान मुलांना आपण मराठीत बोलण्यास आणि मराठीच्या वापरासाठी उद्युक्त केले पाहिजे. कारण कोणतीही भाषा वाढवायची असेल तर मुळता आपल्या घरातून त्याची सुरुवात झाली पाहिजे. आपण आपल्या घरात मराठी ग्रंथ, पुस्तके, वृत्तपत्रे ठेवली पाहिजेत आणि एकमेकाशी बोलताना आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा वापर केला पाहिजे, असे गुणवंत पाटील यांनी सांगितले.Sena

या मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे साहित्यिक गुणवंत पाटील आणि बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्यासह पत्रकारितेच्या क्षेत्रातील सुशांत कुरंगी, मिलिंद देसाई, जगदीश दड्डीकर, जितेंद्र शिंदे, श्रीकांत काकतीकर, सुभानी मुल्ला व रवींद्र जाधव यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, निरंजन अष्टेकर, प्रदीप सुतार आदी शिवसैनिक आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.

दरम्यान शिवसेनेच्यावतीन मोबाईलवर मराठीचा वापर व्हावा यासाठी बेळगावमध्ये व्यापक मोहीम हाती घेणार असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांनी दिली. तसेच आजच्या मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर प्रत्येक मराठी भाषिकांनी आपल्या मोबाईलमधील फोन नंबर, नावांची यादी तसेच इतर माहिती मराठीमध्ये ठेवण्यास सुरुवात करावी, असे आवाहनही केरवाडकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.