अमेरिकेतील ओरलँडो शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक नृत्य अजिंक्यपद स्पर्धेत कु. प्रेरणा गोनबरे या बेळगावच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने उत्कृष्ट नृत्याविष्काराव्दारे सुवर्णपदक पटकावून जागतिक पातळीवर बेळगावचे नांव उंचावले आहे. सुवर्णपदकासह अडीच लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन तिला गौरविण्यात आले आहे.
गेल्या वर्षअखेरीस म्हणजे गेल्या 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या ऑनलाईन स्पर्धेमध्ये जगभरातील 1702 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील पात्र निवडक स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड झाली. त्यात प्रेरणा गोनबरे हिचा समावेश होता. अंतिम फेरीत तिच्यासह 102 स्पर्धक होते.
स्पर्धेच्या अटीतटीच्या अंतिम लढतीत प्रेरणाने आपले नृत्य कौशल्य पणास लावले आणि 89 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अशा तऱ्हेने सुवर्णपदक मिळविणारी प्रेरणाही भारतातील पहिलीच स्पर्धक असल्यामुळे तिचे हे यश बेळगावसाठी निश्चितच भूषणावह आहे.
यापूर्वी 2018 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या जागतिक नृत्य चषक स्पर्धेत प्रेरणाने आठवा क्रमांक मिळवला होता. या स्पर्धेत 45 देशातील स्पर्धकांचा सहभाग होता. तसेच 2019 मध्ये बँकाॅक मधील इंडियाज इंटरनॅशनल ग्रो फेस्टमध्ये प्रेरणा व तिचा भाऊ पार्थ या दोघांनी सुवर्णा पदक मिळविले होते. त्याच वर्षी दुबईतील इंडियाज इंटरनॅशनल ग्रो फेस्टमध्ये देखील या भावंडांनी कांस्य पदक हस्तगत केले होते.
प्रेरणा गोनबरे ही शहरातील केएलएस गोगटे कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ती बेळगावातील सुप्रसिद्ध एम. स्टाईल डान्स अँड बिझनेस अकॅडमीची विद्यार्थी असून तिला नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
बेळगाव सिटी मजदूर को-ऑपरेटिव्ह सोसायट च्या सेक्रेटरी गायत्री गोनबरे यांची ती कन्या आहे. उपरोक्त यशाबद्दल प्रेरणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.