शेतकऱ्यांसह जनतेने केलेल्या मतदानाची जाणीव ठेवून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी के. के. कोप्पमार्गे नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वेमार्गाची योजना रद्द करावी अन्यथा संबंधित सात-आठ गावातील संतप्त शेतकरी त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक यांनी दिला आहे.
बेळगाव लाइव्हशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, बेळगाव ते धारवाड असा नवा रेल्वेमार्ग करण्यात येणार आहे. हा रेल्वे मार्ग पूर्वीच्या आराखड्यानुसार संपगाव, कित्तुर मार्गे बांधण्यात येणार होता. मात्र ज्यावेळी बेळगावचे खासदार सुरेश अंगडी ज्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले त्यावेळी आराखड्यात बदल करून बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग के. के. कोप्प मार्गे तयार करण्याची योजना आखण्यात आली. तथापि या नव्या रेल्वे मार्गामुळे के. के. कोप्पसह या भागातील आम्ही सात -आठ गावांची सुपीक शेतजमीन नष्ट होणार आहे. सदर जमिनीमध्ये या भागातील शेतकरी वर्षभर विविध प्रकारची पिके घेतात. रेल्वेमार्गासाठी ही जमीन भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
यासाठी बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग संबंधित गावांच्या सुपीक शेत जमिनीतून न काढता नजीक असलेल्या पडीक डोंगराळ भागातून अथवा पूर्वीच्या संपगाव, कित्तुर मार्गे बांधण्यात यावा अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी रेल्वे खात्याचे अधिकारी देखील तयार आहेत. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी तसे संमती पत्र दिल्यास सध्याचा नियोजित रेल्वे मार्ग रद्द केला जाईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बऱ्याचदा शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी खासदार मंगला अंगडी यांना निवेदन सादर करून संमती पत्र देण्याची विनंती केली आहे. तथापि खासदार अंगडी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी संमती पत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांचे हे वर्तन जनविरोधी आहे असे सांगून आमची त्यांना विनंती आहे के. के. कोप्प मार्गे बेळगाव धारवाड रेल्वे मार्ग रद्द करण्यात यावा आणि पूर्वीच्या संपगाव, कित्तुर मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात यावी यासाठी त्यांनी तात्काळ संमती पत्र द्यावे.
आपल्याला मतदान केलेल्या शेतकरी मतदार बांधवांचा त्यांनी विश्वासघात करू नये. त्यांच्याकडून सदर संमती पत्र न मिळाल्यास येत्या काळात संबंधित सात-आठ गावातील शेतकरी खासदारांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडले शिवाय राहणार नाही असे प्रकाश नायक यांनी स्पष्ट केले.