चव्हाट गल्ली ढोरवाडा येथे पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारातून पाईपने मारहाण करून ही त्याला गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने तिघा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
परशुराम भवरसिंग धमोणे (वय 70), गजानन परशुराम धमोणे (वय 33) आणि शारदा अशोक धमोणे (वय 30, सर्व रा. ढोरवाडा, चव्हाट गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाची माहिती अशी की, मार्केट पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादी विलास कृष्ण धमोणे (रा. ढोरवाडा चव्हाट गल्ली) यांच्या फिर्यादीनुसार फिर्यादी व आरोपी एकाच गल्लीत राहतात. फिर्यादी विलास व आरोपी परशुराम यांचा मुलगा अशोक धमोणे या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार देणेघेणे होते. त्या व्यवहारातून फिर्यादी व अशोक धामणे यांच्यात वारंवार तंटे -तक्रारी होत होत्या.
त्यानंतर गेल्या 26 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3:30 वाजता सदरी आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन आमच्या अशोक बरोबर तू तंटे तक्रार का करतोस? असा जाब विचारून रागाच्या भरात फिर्यादीला अर्वाच्य शिवीगाळ करून तेथेच असलेल्या ड्रेनेज पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सदर आरोपींनी विनोद रमेश धमोणे यालाही मारहाण करून जखमी केले. तसेच आमच्या नादाला लागला तर तुम्हाला जीवे मारू अशी धमकी देऊन ते निघून गेले.
यासंदर्भात फिर्यादीने मार्केट पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवि कलम 326, 341, 324, 404, 406 सह कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपींवर न्यायालयात दोषारोप दाखल केला होता.
सरकारतर्फे साक्षीदार तपासण्यात आले. तथापि साक्षीदारातील विसंगतीमुळे उपरोक्त आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.