बेळगाव महापालिकेच्या महसूल कर्मचार्यांनी आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी तथा पालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांच्याकडे तक्रार केली आहे. या आधी थेट लिखित तक्रार व आता तोंडी तक्रार करण्यात आल्याने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे गेल्या शनिवारी महापालिका कार्यालयात गेले असता कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे महसूल उपायुक्तांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन आठवड्याभरात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकारामुळे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वादाचा विषय चर्चेत आला आहे. गेल्या जानेवारी महसूल कर्मचाऱ्यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून तक्रार दिली होती.
प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनाही या तक्रारीची प्रत धाडण्यात आली होती. तथापि तक्रार देऊन महिना उलटला तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी शनिवारी जिल्हाधिकारी हिरेमठ महापालिकेत बैठकीसाठी आले असता कार्यालयाच्या आवारातच महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. वरिष्ठांकडून कोणत्या प्रकारे त्रास दिला जातो. लोकांनी दाखल केलेले अर्ज कसे प्रलंबित ठेवले जातात. याची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी केवळ महसूल उपायुक्तांच्या विरोधातच कर्मचारी तक्रारी करताना दिसत होते. दरम्यान महापालिकेतील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या 2 वर्षापासून संघर्ष सुरूच आहे. तथापि वरिष्ठांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी थेट तक्रार केली नव्हती. यावेळी आधी थेट लेखी तक्रार व शनिवारी तोंडी तक्रार करण्यात आल्याने संघर्ष पुन्हा वाढला आहे.