बेळगाव शहरवासीय, व्यापारी आणि उद्योजकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांसंदर्भात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) शिष्टमंडळाने अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील समस्यांसंदर्भातील निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय रिझर्व बँकेने 10 रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून गेल्या 20 नोव्हेंबर 2016 रोजी घोषित केले आहे. मात्र तरीही बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्याप या नाण्याचा स्वीकार केलेला नाही.
परिणामी जिल्ह्यात कोठेच हे नाणे चलनात आणले जात नाही. सध्या बाजारपेठेत 10 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि बहुतांश बँका नोटांऐवजी 10 रुपयाच्या नाण्यांचे वितरण करत आहेत. तथापि व्यापारी आणि नागरिक अद्याप या अधिकृत भारतीय चलनाच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. हे नाणे चलनात आल्यास व्यापारी, बँका आणि सरकारच्या दृष्टीने ते फायदेशीर होणार आहे. तेंव्हा कृपया नागरिकांनी या 10 रुपयाच्या नाण्याचा स्वीकार करावा यासाठी परिपत्रक अथवा प्रसिद्धीपत्रक काढून जनजागृती करावी.
टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजचे प्रलंबित असलेले काम तात्काळ पूर्ण केले जावे. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, रेल्वे अधिकारी, कंत्राटदार आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकार्यांच्या गेल्या 12 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत 31 जानेवारी 2022 पर्यंत या रेल्वेवर ओव्हरब्रिजचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यादृष्टीने अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. सदर रस्ता हा गोवा राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख औद्योगिक वसाहत आणि शैक्षणिक संस्थांना जोडला गेलेला आहे. परिणामी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या प्रलंबित कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
सदर ब्रिजचे काम 31 जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे अधिकारी आणि कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेऊन तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हरब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जावे.
सध्या शहरात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून बहुमजली पार्किंग स्थळाबाबत निर्णय घेतला जावा. तसेच त्याची उभारणी होईपर्यंत शहरातील सरदार्स मैदान तसेच अन्य खुल्या मैदानांवर वाहन पार्किंगची तात्पुरती सोय करून दिली जावी. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा सरकारी कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे सरकारी कामांना उशीर होत आहे. तरी संबंधित खात्याला आदेश देऊन सुवर्ण विधानसौध येथे इंटरनेटचे हायस्पीड फायबर कनेक्शन बसविण्यात यावे.
याव्यतिरिक्त बेळगावच्या व्यवसाय आणि उद्योगाला अधिक चालना मिळावी यासाठी कर्नाटकातील प्रवेशासाठी असलेली आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत. निवेदन सादर करतेवेळी रोहन जुवळी यांच्यासमवेत हेमंत पोरवाल तसेच बीसीसीआयचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.