बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने उद्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्यात मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. नागराज बसीडोनी आणि पै. संतोष पडोलकर (पुणे) यांच्यात होणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या कुस्त्या अनुक्रमे पै. आकाश घाडी विरुद्ध पै. सौरभ पाटील आणि पै. पवन चिकदिनकोप विरुद्ध पै. किर्तिकुमार बेनके अशा होणार आहेत. याखेरीज या कुस्ती मैदानात अन्य 50 हून अधिक चटकदार कुस्त्या पाहण्याची संधी बेळगाव परिसरातील कुस्ती शौकिनांना मिळणार आहे.
आनंदवाडी आखाडा येथे उद्या होणाऱ्या या जंगी कुस्ती मैदानाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या आणि डॉ. गणपत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कुस्ती मैदानास माजी मंत्री व विद्यमान लोकप्रतिनिधी मान्यवर हजेरी लावणार आहेत.
कुस्ती मैदानाची आज दिवसभर जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे. तरी सदर जंगी कुस्ती मैदानाचा बेळगाव परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून आखाडा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने केले आहे.