हिंदूंच्या समाध्या बांधून आम्हाला राज्य करायचे नाही असे सांगून बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष यांच्या कुटुंबीयांची एकाही काँग्रेस नेत्याने भेट घेतली नाही. हर्ष ऐवजी एखाद्या मुस्लीम कार्यकर्त्याची हत्या झाली असती तर सोनिया गांधी, राहुल गांधीपासून काँग्रेस नेत्यांची त्याच्या घरी रीघ लागली असती, अशी टीका विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी केली.
शिमोगा येथे हत्या झालेला बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याच्या सिगेहट्टी येथील घरी त्याच्या शोकाकुल कुटुंबीयांची आमदार बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनी मंत्री ईश्वराप्पा यांच्या समवेत भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी हर्षच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदतीचा धनादेशही दिला.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार यत्नाळ यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. राज्यात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येचे प्रमाण वाढले आहे. दुर्लक्ष केले तर हे प्रमाण वाढतच जाईल. या हत्त्यांच्या मागे एक मोठे षडयंत्र आहे. हिंदुंना धीर देण्याचे कार्य झाले पाहिजे.
मंत्री ईश्वराप्पा आहेत म्हणून येथे हिंदू सुखाने जगत आहेत. तथापि हिंदू एकवटले तरीही आरोपींना शिक्षा होत नाही आहे. केरळच्या सीमेवरून आरोपींना शस्त्रे पुरविण्यात येत आहेत. हे शुरांचे काम नव्हे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने घरच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले नाही ते जर एखाद्या मुस्लिमांची हत्या झाली असती तर सोनिया गांधी राहुल गांधी पासून सर्व काँग्रेस नेत्यांची तिथे रीघ लागली असती अशी बोचरी टीका आमदार यत्नाळ पाटील यांनी केली.
सोशल मीडियावर मुस्लिम धर्मीयांची पेजेस ओपन करून बघा तेथे जाहीर धमक्या दिलेल्या आढळतात. त्यावर पोलिसांनी अंकुश ठेवला पाहिजे. हर्षच्या हत्येचे प्रकरण तपासासाठी एनायएकडे सोपवावे. काश्मीरमध्ये देखील महिलांना पुढे करून भ्याड कृत्य करण्यात येत होती. मात्र केंद्राने कठोर पावले उचलल्याने ते थंड पडले आहेत. जहाल मुस्लिम संघटनांवर बंदी घातली पाहिजे.
हिंदूंच्या समाध्या उभारून त्यावर सत्ता भोगणारे आम्ही नव्हे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सत्तेवर आलो आहोत. आमचा जीव गेला तरी बेहत्तर आम्ही हिंदूंचाच बाजूने उभे राहू. त्यांचे रक्षण करू, त्यांच्या हत्या होऊ देणार नाही. हर्षची हत्या ही अशी शेवटची ठरावी याची दक्षता घेऊ, असेही आमदार यत्नाळ यांनी सांगितले. एकंदर हर्षच्या हत्येचा भाजपने तीव्र निषेध केला आहे. त्याशिवाय हर्षच्या कुटुंबाला धीर देऊन आर्थिक मदतही केली आहे.