बेळगाव शहरातील आश्रय फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे आज शुक्रवारी खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी येथील श्री मारुती मंदिराच्या ठिकाणी असलेले मलप्रभा नदीचे पात्र श्रमदानाने स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे हब्बनहट्टी परिसरात कौतुक होत आहे.
बेळगावच्या आश्रय फाउंडेशनच्यावतीने आज हब्बनहट्टी येथील नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. आश्रय फाऊंडेशनच्या संचालिका सफला नागरत्ना यांच्या पुढाकाराने ‘आश्रय’मधील मुलींची सहल आज शुक्रवारी हब्बहट्टी (ता. खानापूर) येथे नेण्यात आली होती. यावेळी तेथील मंदिराला जाऊन मुलींनी देवदर्शन घेतले आणि मंदिराच्या मागून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात खेळण्याचा आनंदही लुटला.
परंतु त्याचवेळी नदीमध्ये टाकण्यात आलेले निर्माल्य, टाकाऊ वस्तू, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि त्यामुळे दूषित झालेले नदीचे पात्र पाहून मुलींना दुःख झाले. परिणामी सर्वांनी नदीपात्राची स्वच्छता करण्याचे ठरवले आणि थोड्याच वेळात सर्व कचरा बाजूला काढून नदीचे पात्र स्वच्छ केले.
आश्रयच्या संस्थापिका सफला नागरत्ना यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रय फाऊंडेशनचे सल्लागार सदस्य सुजित व कार्यकर्ते विष्णू यांच्या नेतृत्वाखाली हा नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
नद्या या जीवनदायिनी असून लोकांनी नदीमध्ये कचरा व टाकाऊ साहित्य फेकू नये, असे आवाहनही आश्रय फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान सगळे फाउंडेशनच्या मुलींनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल हब्बनहट्टी श्री मारुती देवस्थान व्यवस्थापन मंडळ तसेच परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.