बेंगलोर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याची विटंबना केली त्या पुतळ्याला महाराष्ट्रातील मावळचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज शनिवारी शिवजयंतीनिमित्त दुग्धाभिषेक घालून पावन केले.
सदाशिवनगर, बेंगळूर येथे समाजकंटकांकडून शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून विटंबना करण्यात आल्याची घटना गेल्या 17 डिसेंबर 2021 रोजी घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यासह बेळगाव शहर परिसरातील शिवप्रेमींच्या संतापाचा उद्रेक झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या रात्री हजारो शिवप्रेमी शहरातील धर्मवीर संभाजी चौकात जमले होते.
संतप्त कार्यकर्त्यांनी या भागातील सर्व रस्ते रोखून धरून बेंगलोर येथील संबंधित समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यानंतर क्रांतिवीर संगोळी रायान्ना पुतळा विटंबनाची घटना अनगोळ येथे घडली होती. या सर्व प्रकारांना जबाबदार धरून पोलिसांनी मराठी भाषिक युवकांवर राजद्रोह, खुनाचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांनी आज छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खास बेंगलोरला भेट देऊन विटंबना करण्यात आलेल्या शिवरायांच्या त्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून पुन्हा पावन केले. प्रारंभी खासदार कोल्हे यांनी आपल्या सुस्पष्ट खड्या आवाजात शिवमंत्र म्हंटला.
त्यानंतर त्यांनी पुतळ्याचे रीतसर पूजन करून दुग्धाभिषेक घातला. तसेच शिवरायांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ -जय शिवराय, हर हर महादेव, जय जिजाऊ -जय शिवराय या घोषणा देण्यात येत होत्या.