Wednesday, November 20, 2024

/

नाईट क्लब, पब्सवर निर्बंध न घातल्यास आंदोलन

 belgaum

बेळगाव शहरातील नाईट क्लब आणि पब्समध्ये घडत असलेल्या बेकायदेशीर आणि असंबद्ध प्रकारांवर तात्काळ निर्बंध घातले जावेत अशी मागणी करून ही कारवाई 28 फेब्रुवारी पूर्वी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डाॅ. शंकरगौडा बी. पाटील यांनी दिला आहे.

नगरसेवक डाॅ. शंकरगौडा पाटील यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. जिल्हाधिकार्‍यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

बेळगाव शहरात अलीकडे नवे नाईट क्लब आणि पब्सची संख्या वाढत असून यामुळे प्रभावित झालेली युवापिढी मोठ्या संख्येने नाईटक्‍लबमध्‍ये हजेरी लावत आहे आणि याचे पर्यवसान शहरात अनेक गैरप्रकारांना ऊत येण्यामध्ये होत आहे. हे नाईट क्लब आणि पब्स मनोरंजनाच्या नांवाखाली युवा पिढीची फसवणूक करून त्यांना बिघडवण्याचे काम करत आहेत. या ठिकाणी युवक-युवती दारूच्या तसेच अन्य गैरप्रकारांच्या आहारी जात आहेत.

जोडप्याला मोफत प्रवेश, मुलींना दारू मोफत आदी विविध स्कीमची प्रलोभनं या क्लबमध्ये दाखविले जात असून हा चिंतेचा विषय आहे. या ठिकाणी संबंधितांची खातरजमा न करताच खोल्या (रूम्स) उपलब्ध करून दिल्या जातात. हे नाईट क्लब मध्यरात्री उशिरापर्यंत म्हणजे रात्री 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत खुले असतात. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन या नाईट क्लब आणि पब्सवर पुढीलप्रमाणे कांही निर्बंध घातले जावेत.Shankar patil

सदर नाईट क्लब आणि पब्स रात्री ठीक 11 वाजता बंद केले जावेत. कोणालाही मोफत प्रवेश दिला जाऊ नये. ज्यांच्याकडे कोणताही ओळख पुरावा नसेल अशा अविवाहितांना रूम्स दिल्या जाऊ नयेत. या नियमांचे पालन करण्यात चूक झाल्यास व्यवस्थापनाला जबाबदार धरले जावे.

एकंदर शहरातील नाईट क्लब आणि पब्समधील गैरप्रकारांची आपण सखोल चौकशी करावी आणि तात्काळ योग्य ती कारवाई करावी. प्रशासनाने या नाईट क्लब्स आणि पब्सवर येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डॉ. शंकरगौडा बी. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाच्या प्रती पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना देखील सादर केल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.