शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगावात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण कर्नाटकात उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार बेळगावात आज बुधवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी संयुक्तरीत्या राणी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला.
मोर्चाच्या अग्रभागी एका खुल्या वाहनात हर्षचे छायाचित्र असलेला भव्य बॅनर लावून अमर रहे, अमर रहे, हर्ष अमर रहे! आदी घोषणा देत, भगवे झेंडे फडकावत, गळ्यात भगवे उपरणे -शेले घालून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. हर्षच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. एडीपीआय, पीएफआय या संघटनांवर बंदी घाला, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हरी गुरू महाराज म्हणाले धर्म व राष्ट्रहितासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या सिंहासारख्या निधड्या हर्ष या कार्यकर्त्यांची मुस्लिम संघटनांच्या काही गुंडांनी हत्या केली आहे. समस्त हिंदू समाज, सकल साधू समाज याचा तीव्र निषेध करतो. हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर असताना ही घटना घडणे खेदजनक आहे. हर्षच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली नाही तर संपूर्ण हिंदू समाज पेटून उठेल असा इशाराही त्यांनी दिला.
विहिंप नेते कृष्णा भट म्हणाले की, हर्षच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे. राज्यात 18 हून अधिक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. हे सगळे जिहादी मुसलमानांमुळे घडत आहे हे सत्य आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. हत्या केलेल्यांना केवळ तुरुंगात डांबून उपयोग नाही तर त्यांचा एन्काउण्टर करावा, अशी मागणीही भट यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चा आल्यानंतर हर्ष मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली जात होती. आजच्या या मोर्चात विहिंप आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.