शेडबाळ -अथणी -विजापूर या नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाचे पुढील कार्य आर्थिक दृष्ट्या अव्यवहार्य आहे. तथापि बागलकोट -कुडची दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील रेल्वेमार्गांसंदर्भात खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याशी चर्चा करताना केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी उपरोक्त माहिती दिली. शेडबाळ -अथणी -विजापूर हा 112.6 कि. मी. अंतराचा नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग 2012 -13 साली पूर्ण करण्यात आला आहे.
तथापी आता या प्रकल्पाचे पुढील कार्य आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे. बागलकोट -कुडची या 142 कि. मी. अंतराचा 1,530 कोटी रुपये खर्चाचा नव्या रेल्वेमार्गाचा प्रकल्प 2010 -11 साली मंजूर झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत कर्नाटक सरकार रेल्वेमार्गासाठी आवश्यक जादा निशुल्क देणार आहे त्याचबरोबर बांधकामाचा 50 टक्के खर्च उचलणार आहे असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
सदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला निधीसह मंजुरी मिळाली आहे. या रेल्वेमार्गासाठी 16.82 हेक्टर जमिनीचे हस्तांतर देखील झाले आहे असे सांगून कर्नाटकातील रेल्वेचे पायाभूत प्रकल्प नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.