युद्ध पातळीवरील रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामामुळे खानापूर -असोगा रेल्वे फाटक आज रविवारपासून पुढील 10 दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे खात्याकडून कळविण्यात आले आहे.
असोगा रेल्वे फाटक बंद राहणार असल्यामुळे खानापूर -असोगा मार्गावरील वाहतूक बाचोळीमार्गे वळविण्यात आली आहे. सध्या बेळगाव -लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी असोगा -खानापूर मार्गावरील रेल्वे फटकाचे काम काल शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी असोगा, कुटिन्होनगर, मणतूर्गा आदी भागातून खानापूरला येणाऱ्या वाहन चालकांना तसेच नागरिकांना आता पुढील 10 दिवस बाचोळी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे अभियंता के. शशीधर यांनी केले आहे.
असोगा -खानापूर रस्त्यावरील रेल्वे फटकाचे काम येत्या 10 दिवसात पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. असोगा फाटकाला लागूनच भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. हा भुयारी मार्ग येत्या मे महिन्याअखेर तयार होईल, अशी माहिती देखील के. शशिधर यांनी दिली आहे.