कोरोना प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आला नसल्यामुळे शिक्षण खात्याने यंदा सलग तिसऱ्या वर्षी शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यासह शालेय सहल काढण्यावर निर्बंध घातले आहेत.
आपल्या देशात गेल्या फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. परिणामी त्यावर्षी सर्व प्रकारची शालेय स्नेहसंमेलन आणि शालेय सहलींवर निर्बंध लादण्यात आले होते.
त्यावर्षी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी देखील कोरोना संसर्ग कायम राहिल्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात आला होता. शासनाचे कोरोना संबंधित नियम लागू असल्यामुळे मागील वर्षीही स्नेहसंमेलन आली सहलींचे आयोजन झाले नव्हते.
आता सलग तिसऱ्या वर्षी स्नेहसंमेलनं आणि सहलींचे आयोजन न करण्याची सूचना शिक्षण खात्याने शाळा प्रशासनांना केली आहे. कोरोना संसर्ग कमी झालेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने यंदा गर्दीचे कार्यक्रम न घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षीही शाळांमध्ये स्नेहसंमेलन होणार नाहीत.
त्याचप्रमाणे दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळात शालेय सहलींचे आयोजन केले जात होते. तेही यंदा रद्द करण्यात आले असून शिक्षण खात्याने नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत सर्व शाळांना याबाबतची सूचना केली आहे.