बेळगाव शहर उपनगरात गेल्या चार-पाच दिवसांपासून सोन्याचे मंगळसूत्र, गंठण आदी लांबविण्याचे अर्थात चेन स्नॅचिंगचे प्रकार पुन्हा सुरू झाल्यामुळे शहरात कुख्यात इराणी टोळी पुनश्च सक्रिय झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अलीकडच्या काळात बेळगाव शहर उपनगरात रस्त्यावर ये-जा करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चेन, गंठण आदी लांबविण्याचे अर्थात चेन स्नॅचिंगचे प्रकार पूर्णपणे थांबले होते. एकेकाळी इराणी टोळीतील गुन्हेगारांनी बेळगाव शहर व उपनगरात अक्षरशः हैदोस घातला होता. माळमारुती पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी पुणे, अहमदनगर येथील इराणी टोळीतील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर चेन स्नॅचिंगच्या प्रकार थांबले होते. आता पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत.
गणेशपुरजवळ गेल्या सोमवारी दुचाकीवरून विवाह सोहळ्यास निघालेल्या जुने बेळगाव येथील एका वृद्ध दाम्पत्याची लूट झाली होती. पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी 5 तोळ्याचे दागिने या दाम्पत्यांकडून लांबविले.
त्यानंतर श्रीनगर येथील एका शिक्षकाचे तोतया पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचे 3 तोळे सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर लगोलग मोटरसायकलवरून आलेल्या दोघा भामट्याने दूध घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील 4 तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना काल बुधवारी सकाळी महांतेशनगर एसबीआय बँके जवळ घडली.
वरील सर्व प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत. तथापि अचानक पणे सुरु झालेल्या चेन स्नॅचिंग आणि भामटेगिरीच्या या घटनांमुळे एकेकाळी शहरात हैदोस घालणाऱ्या कुप्रसिद्ध इराणी टोळीतील गुन्हेगार पुन्हा शहरात सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.