सरकारच्या विविध खात्यांतद्वारे उपलब्ध झालेल्या 197 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्याबाबत आयोजित विविध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज सरकारी विश्रामधाम येथे महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, स्मार्ट सिटी, लघु पाटबंधारे, एल अँड टी, गॅस पाईपलाईन, हेस्कॉम आदी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध खात्यांकडून आलेल्या 197 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्याबाबत चर्चा झाली. कोट्यावधी रुपयांच्या या सरकारी अनुदानातून बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधला जावा, अशी सूचना आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बैठकीत बोलताना आमदार अनिल बेनके यांनी एल अँड टी कंपनी आणि गॅस पाईपलाईन कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी काही दुरुस्ती अथवा विकासाची कामे आहेत ती येत्या महिन्याभरात पूर्ण करावी अशी सूचना करून त्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत रस्ता खोदाईची परवानगी दिली जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली. त्याचप्रमाणे उर्वरित खात्याच्या अधिकाऱ्यांनीही शहरातील विकासाची कामे पावसाळ्यापूर्वी संपविली पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली. बेळगाव शहरी भागातील गल्ल्यांमध्ये विकास कामे राबविली जाणार आहेत.
ही कामे सुरू असताना त्या गल्ल्यांमधील रहिवाशांनी सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास ती माझ्या निदर्शनास आणून द्यावी. संबंधित समस्या तात्काळ सोडविले जाईल. कंत्राटदाराने देखील प्रत्येक विकास काम उत्तम दर्जाचे होईल याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
बेळगाव उत्तर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 52 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले असल्याचे आमदारांनी यावेळी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम खात्याला 47 कोटी रुपये, मुझराई खात्याला 2 कोटी आणि लघु पाटबंधारे खात्याला 3 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या सर्व अनुदानमधून मंदिरं, रस्ते, गटारी, पूल, कालवे, पथदीप आदी विकास कामे हाती घेऊन लवकरात लवकर ती पूर्ण करावीत असे बेनके यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या कारभारामुळे अनेक रस्त्यांची व गटारांची कामे रखडली आहेत. त्याचा सार्वजनिकांना त्रास होत आहे. तेंव्हा एल अँड टी कंपनीने बेळगाव उत्तरमधील कामे वेळेत पूर्ण करावीत अशी कडक सूचना आमदारांनी केली.
शहरातील रस्ते तयार करण्याआधी गॅस पाईपलाईन घालणे, अंडर पॉवर केबल टाकणे आणि पाण्याचे पाईप बसवणे ही कामे करून घेतली जावी. रस्ता तयार केल्यानंतर खुदाईची कामे हाती घेण्याचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी एल अँड टी कंपनी गॅस कंपनी आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सुनावले.