सरस्वतीनगर येथील रस्ता रुंदीकरण प्रकरणी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या विकास अधिकारी (पीडीओ) सुजाता बटकुर्की यांच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, असा आदेश प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना दिला आहे.
सरस्वतीनगर येथील रस्ता रुंदीकरणात नुकसान झालेल्या रवींद्र मोहिते व मनोहर पाटील यांनी नुकतीच प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी थेट पीडीओ सुजाता बटकुर्की यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधा तब्बल सहा वेळा फोन करूनही बटकुर्की यांनी प्रतिसाद तिला नाही. सातव्या वेळी बटकुर्की यांनी फोन घेतल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी त्यांची झाडाझडती घेतली.
रस्ता 30 फूट असताना 60 फूट करण्याचे कारण काय? रुंदीकरणाचा आदेश कोणी दिला? असा सवाल प्रादेशिक यांनी केला. त्यावर बटकुर्की यांनी थातुरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा तेथील बांधकामे पाडतानाचे व्हिडिओ व छायाचित्रे आपल्याकडे आली आहेत. त्यासंदर्भातील चौकशी करून कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक आयुक्तांनी त्यांना सांगितले.
कारवाईचा इशाऱ्यामुळे हादरलेल्या पीडीओ सुजाता बटकुर्की यांनी लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून रस्त्याचे काम केल्याची कबुली दिली. त्यावर शासनाची नोकरी करता की लोकप्रतिनिधींची? असा सवाल प्रादेशिक आयुक्तांनी केला. तेंव्हा बटकुर्की निरुत्तर झाल्या. त्यानंतर प्रादेशिक आयुक्तांनी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांच्याशी संपर्क साधून पीडीओ बटकुर्की यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.