भारतीय अवकाश संशोधन संघटना अर्थात इस्त्रोसाठी बेळगावच्या फ्लिक्सपर्ट बेलोज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्वतः डिझाईन करून डबल युनिव्हर्सल पद्धतीचे एक्सपान्शन बलोज तयार केले आहेत. ज्यांचा वापर इस्रोच्या त्रिवेंद्रम येथील ट्रायसाॅनिक ब्लोडाऊन विंड टनलसाठी केला जाणार आहे.
फ्लिक्सपर्ट बेलोज प्रा. लि.ने आपल्या उद्यमबाग येथील आयएसओ प्रमाणीत कारखान्यामध्ये इस्त्रोसाठीचे एक्सपान्शन बेलोज डिझाईन करून तयार केले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अतिशय उच्च दर्जाचे कौशल्य वापरून त्याचप्रमाणे निर्मितीच्या विविध टप्प्यांवर कडक गुणवत्ता तपासणी करण्याद्वारे या 2 मीटर व्यासाच्या आणि 2 मीटर लांबीच्या एक्सपान्शन बेलोजची निर्मिती करण्यात आली आहे.
आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्या फ्लिक्सपर्ट बेलोज प्रा. लि. कंपनीला या पद्धतीने एक्सपान्शन बेलोजचा पुरवठा करून देश हिताच्या प्रकल्पात आपले योगदान देत असल्याचा सार्थ अभिमान आहे.
1992 साली स्थापन झालेली फ्लिक्सपर्ट बेलोज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रामुख्याने जागतिक दर्जाचे एक्सपान्शन बेलोज तयार करण्यामध्ये अग्रेसर आहे. याव्यतिरिक्त जगभरातील 40 हून अधिक देशांना या कंपनीकडून फ्लेक्सिबल पाईपिंग सिस्टीम निर्यात केली जाते.