कर्नाटकात कोरोना पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिलेल्या संकेतानुसार आता राज्यात लागू केलेला वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. याबाबत आता फक्त मुख्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणा करणे इतकेच बाकी आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती बरोबरच वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूच्या आवश्यकते बाबत सध्या बेंगलोर विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची कोरोना तांत्रिक सल्लागार समिती, आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत वीकेंड कर्फ्यू हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नाईट कर्फ्यू हटविण्याबाबतही विचार विनिमय सुरू असून त्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे हे दोन्ही कर्फ्यू हटविल्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी कोणत्या प्रभावी उपाययोजना करता येतील यावरदेखील बैठकीत गांभीर्याने चर्चा होणार आहे. सदर बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई वीकेंड कर्फ्यू, नवी नियमावली तसेच अन्य बाबींची अधिकृत घोषणा करणार आहेत.
विकेंड कर्फ्यूमुळे लोक त्रस्त तर व्यापारी आणि उद्योजक अडचणीत आले आहेत. दुसरीकडे संसर्ग नियंत्रित करण्यासाठी तज्ञांना विकेंड कर्फ्यु आणि रात्रीचा कर्फ्यु आवश्यक वाटत आहे. जीवाचे रक्षण महत्त्वाचे असे ते ठामपणे सांगत आहे त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यावरून सरकारची कोंडी झाली आहे. तथापि हाती आलेल्या वृत्तानुसार राज्यातील वीकेंड कर्फ्यू हटविण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी लोकांना त्रास होईल अशा लाॅक डाऊनची गरज नाही. परंतु दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करणे अनिवार्य आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले आहे. रुग्ण संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केले जाणार आहेत.
सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. संसर्गाचे प्रमाण कांही ठिकाणी कमी-अधिक आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे आढळलेल्या रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा अधिक जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या सर्व बाबींचा विचार करून तसेच कोरोना तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीवरून विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे.