24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन मिळालेल्या बेळगाव शहरवासियांवर सध्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आले आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या 10 जानेवारीपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी अद्याप यश आलेले नाही.
पाणीपुरवठा खात्यातील पंप ऑपरेटर्स, हॉल्वमन आधी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या 10 जानेवारीपासून संप पुकारल्यामुळे शहर पाणीपुरवठ्याला त्याचा फटका बसला आहे. शहरातील बऱ्याच भागात गेल्या 10 दिवसांपासून पिण्याचे पाणी आलेले नाही. तात्काळ पाणीपुरवठा केला जावा यासाठी काल अशोक चौक येथे आंदोलनही छेडण्यात आले होते. पाणीटंचाईवर कांही भागांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही भागात कसलीच पर्यायी सोय करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वणवण फिरून बोरवेल अथवा स्वच्छ पाण्याच्या विहिरींद्वारे नागरिकांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे.
सदाशिवनगर, शहापूर, वडगाव, अनगोळ, कणबर्गीसह विविध भागात गेल्या तीन -चार दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गल्लीत टँकर येताच महिलावर्गाची झुंबड उडत आहे. टॅंकरसमोर घागरीच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. शहरातील कांही गल्ल्यांमध्ये विहिरी असल्याने नागरिक तेथील पाण्याचे उपयोग करू शकतात.
मात्र ज्या ठिकाणी विहिरी किंवा इतर सुविधा नाहीत त्या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर लवकर मान्य करून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शहरवासियांतून केली जात आहे.