Tuesday, January 7, 2025

/

‘या’ दोघांना जामीन, तर ‘यांना’ अटकपूर्व जामीन

 belgaum

गेल्या महिन्यात शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळा विटंबना आणि दगडफेक प्रकरणी अटक झालेल्या दोघांना राजद्रोह आणि 307 गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. ॲड. अमर येळ्ळूरकर याना सुद्धा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

बेंगलोर येथे गेल्या 17 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा निंद्य प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच रात्री शहरातील धर्मवीर संभाजी चौकात शिवप्रेमींनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडून विटंबनेच्या घटनेचा धिक्कार केला आणि त्याला जबाबदार समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्याच वेळी शहरात दगडफेकीसह अनगोळ येथील संगोळी रायण्णा पुतळा विटंबनेचा प्रकार घडला. या सर्व प्रकाराला जबाबदार धरून पोलिसांकडून प्रारंभी रमाकांत कोंडुसकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, सरिता पाटील मदन बामणे आदी 54 जण आणि अन्य 100 ते 150 लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 201 /2021 मध्ये भा.द. वि. कलम 143, 147, 148, 307, 353, 332, 153, 326, 427, 435, 109, 504, 506 आणि 149 अन्वये संबंधित सर्वांवर हे गुन्हे नोंदविले गेले.

त्याचप्रमाणे कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ डिस्ट्रक्शन अँड लॉस ऑफ प्रोपर्टी ॲक्ट या कायद्याच्या कलम 2 -अ अन्वये गुन्हा नोंदविला गेला. उपरोक्त गुन्हे गेल्या 17 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजता नोंद झाले आणि लागलीच आरोपींपैकी 36 जणांना पोलिसांनी अटक केली. यासाठी फिर्यादी म्हणून मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी रुक्मिणी लखननौडर यांचे नांव आहे. त्यानंतर साधारण आठवड्याभराने या सर्व गुन्ह्यांत मध्ये 124 -अ हा राजद्रोहाचा गुन्हा देखील सामील करण्यात आला आहे.

यावर ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. परंतु त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात त्याच्याविरोधात अपील करून याचिका दाखल केली होती. येळ्ळूरकर यांच्यावतीने ॲड. राम घोरपडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर (क्र. 100068/2022) आज उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात समोर सुनावणी होऊन ॲड. अमर येळ्ळूरकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. येळ्ळूरकर यांच्यावतीने ॲड. राम घोरपडे यांच्यासह ॲड. नीलेंद्र गुंडे काम पाहत आहे.

दरम्यान, सदर प्रकरणात अटक होऊन कारागृहात दोघांच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी झाली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने या दोघांचा जामीन देखील मंजूर केला आहे. यांच्यावतीने उच्च न्यायालयाचे वकील ॲड. विजय हिरेमठ आणि ॲड. महेश बिर्जे यांनी कामकाज पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.