मधर्मादाय खात्याच्या ‘क’ वर्गामध्ये बेळगाव जिल्ह्याच्या व्याप्तीतील मंदिराच्या व्यवस्थापन मंडळावर विश्वस्तांची नियुक्ती केली जाणार आहे. ही नियुक्ती 3 वर्षांसाठी असणार असून इच्छुक भक्तांनी यासाठी अर्ज करायचा आहे. बेळगाव जिल्ह्यातील 17 देवस्थानांवर विश्वस्त समितीची नेमणूक केली जाणार असून 3 फेब्रुवारीपूर्वी भाविकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था व धर्मादाय ट्रस्ट कायदा 1997 कलम 30 अंतर्गत जिल्ह्यातील ‘क’ वर्ग मंदिरांवर व संस्थांवर व्यवस्थापन समिती नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अर्जाचे आवाहन करण्यात आले असून 15 दिवसाच्या आत अर्ज बेळगाव जिल्हा धर्मादाय खात्याच्या उपायुक्त कार्यालयात पाठवून द्यावयाचे आहेत. प्रत्येक देवस्थानांमध्ये आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षणाची विभागणी परिशिष्ट जाती -1, जमाती -1, महिला -2, देवस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक -1, इतर -4 अशी करण्यात आली आहे. एकूण 9 सदस्यांची विश्वस्त म्हणून निवड केली जाणार आहे.
अर्जदाराचा देवावर विश्वास असून तो 21 वर्षावरील असावा. आरक्षण प्रवर्गातील अर्जदार असेल तर त्याचे जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक व्यवस्थापन समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज करता येणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सहभागी होता येणार नाही.
बेळगाव जिल्ह्यातील ‘क’ वर्गात येणारी देवस्थाने पुढीलप्रमाणे आहेत. बेळगाव तालुका : ग्रामदेवी देवस्थान माविनकट्टी, श्री लक्ष्मी देवस्थान अलतगा. खानापूर तालुका : रामलिंगेश्वर देवस्थान असोगा, रवळनाथ देवस्थान मणतुर्गा, चिकोडी तालुका : श्री लक्ष्मी देवस्थान नागरमुन्नोळी, विरभद्र देवस्थान कोथळी, मारुती देवस्थान कोथळी, कलमेश्वर व मारुती देवस्थान डोणवाड, बसवेश्वर देवस्थान कोथळी, मारुती देवस्थान जोडकुरळी, हुक्केरी तालुका : विठ्ठल रुक्माई देवस्थान हनजानट्टी, बसवेश्वर देवस्थान मजली, करेम्मा देवस्थान बजांत्री गल्ली हुक्केरी. कागवाड तालुका : रुक्मिणी विठ्ठल देवस्थान शेडबाळ. रायबाग तालुका : श्री रेणुका देवी यल्लमा देवस्थान निलजी. सौंदत्ती तालुका : हनुमान देवस्थान सौंदत्ती.