बेळगाव शहर पोलिस आता एका नव्या भूमिकेत दिसत आहेत. चक्क लाठी बाजूला ठेवून हातातील माईकद्वारे कोरोना आणि रहदारी नियमांसंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे.
गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणारी लाठी आणि पोलीस यांचे नाते अतूट आहे. हातात लाठी -काठी नसलेला पोलीस खरंतर खऱ्या अर्थाने पोलीस वाटत नाही. तथापि आपल्या या प्रतिमेला बेळगाव शहर पोलिसांनी छेद दिला आहे.
सध्या शहर पोलीस काठी बाजूला ठेवून हातात माईक घेऊन फिरताना दिसत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रमुख भागांमध्ये कोरोना तसेच रहदारी नियमाबाबत माईकवरून जनजागृती करताना पहावयास मिळत आहेत.
शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, बसवेश्वर सर्कल आदी ठिकाणी पोलीस माईकच्या माध्यमातून सामाजिक अंतर, फेस मास्क आणि रहदारी नियमांचे पालन करण्याबाबत जाहीर सूचना देत आहेत.