कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकाच घरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त करून आबाधित आढळल्यास संबंधित घर सील डाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेकडून प्रत्येक प्रभागासाठी टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे.
बेळगाव महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी नुकत्याच बजावलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व 58 प्रभागांसाठी टास्क फोर्स समिती स्थापन झाली आहे. या समितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण भागात येणार्या सर्व प्रभागांची जबाबदारी दक्षिण विभागाचे शहर अभियंते व्ही. एम. हिरेमठ यांच्याकडे आहे. त्यांच्या मदतीसाठी दोन सहाय्यक कार्यकारी अभियंते, तीन सहाय्यक अभियंते, तीन कनिष्ठ अभियंते व चार वर्क इंस्पेक्टर नियुक्त केले आहेत. उत्तर विभागाची जबाबदारी शहर अभियंते अनंत पद्मनाभन यांच्याकडे असून त्यांच्या मदतीसाठी दोन सहाय्यक कार्यकारी अभियंते, दोन सहाय्यक अभियंते, चार कनिष्ठ अभियंते, चार वर्क इन्स्पेक्टर तैनात केले आहेत. प्रत्येकाला प्रभागाची जबाबदारी नेमून देण्यात आली असून काल शनिवार पासून त्यांनी आपले काम सुरू केले आहे.
प्रभागात कोरोनाबाबत जागृती करणे, कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे, कोरोना बाधित आढळल्यास संबंधित घर सील डाउन करणे, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे आदी जबाबदाऱ्या या टास्क फोर्स समितीवर असणार आहेत.
पहिल्या लाटेप्रसंगी कोरोना बाधिताचे घर तातडीने सील केले जात होते. परंतु यावेळी ज्या घरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त बाधित आढळल्यास ते घर सील डाऊन करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान यावेळी हॉस्पिटल्स बेड्स ऑक्सिजन साठा सज्ज असला तरी अद्याप कोविड केअर सेंटर्स सुरू केलेली नाहीत.