परराज्यातून आलिशान कार चोरून आणून त्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात विकणाऱ्या टोळक्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांना जेरबंद केले असून या टोळीतील तिघेही बेळगावचे आहेत.
तब्बल पाच कोटी पाच लाख 50 हजार रुपये किमतीच्या 31 कार त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या असून या साऱ्या कारवाईचा मास्टरमाइंड यापूर्वी अंमली पदार्थ विक्री प्रकरणात सापडलेला आकाश देसाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कोदाळी येथील ग्रीन हिल रिसॉर्ट च्या माध्यमातून या कारची विक्री करण्यात येत होती ,अशी माहितीही कोल्हापूर पोलिसांनी उघड केली आहे.
जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (वय 42) रा. न्यू गांधीनगर, यश प्रशांत देसाई (वय 26) रा. बोरमळ गल्ली ,शहापूर आणि खलिद महंमद लियाकत सारवान ( वय 40) रा. सुभाषनगर अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
एमआयडीसी येथील नागावच्या महिंद्रा लॉजिस्टिक या कंपनीतून स्विफ्ट डिझायर गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली होती.
यासंदर्भात तपास सुरू असताना स्विफ्ट डिझायर चंदगड तालुक्यातील ग्रीन हिल रिसॉर्ट येथे 6 जानेवारीला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
रिसॉर्ट वरून तेरा चोरीला गेलेल्या कार हस्तगत करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांवरून चोरलेल्या कार या रिसॉर्टवर आणून ठेवल्या जात होत्या आणि ग्राहकांना तेथे बोलावून तेथूनच विक्री केली जात होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
चोरीचे कनेक्शन बेळगाव शहरातील शहापूर या उपनगराशी जोडले गेल्याचे दिसून आले असून आरोपी यश देसाई याचा काका आणि यापूर्वी ड्रग पेडलर म्हणून ओळखला गेलेला आकाश भालचंद्र देसाई (रा. शहापूर )याने या प्रकरणातील मास्टर माईंड ची भूमिका निभावली आहे.
घेतलेल्या कार आपल्या हस्तकांकरवी तो विकत होता. मणिपूर राज्यातील राजकुमार किरण सिंग या साथीदाराच्या जोडीने हा व्यवसाय चालू केल्याचे उघड झाले आहे. या कार कर्नाटक आणि महाराष्ट्रात विकल्या जात होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली असून अद्याप आकाश देसाईला याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.