कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची येळ्ळूर भाविकांची सौंदत्ती डोंगरावरील यात्रा तसेच येळ्ळूर येथील मळ्यातील यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे श्री चांगळेश्वरी मंदिर ट्रस्ट, येळ्ळूर यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.
श्री चांगळेश्वरी मंदिर ट्रस्ट, येळ्ळूर आणि कार्यकारणीच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण कंग्राळकर होते. कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरीएंटच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे.
सरकारच्या आदेशानुसार सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आणि यात्रोत्सवांवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून यंदाची येळ्ळूर भाविकांची सौंदत्ती डोंगरावरील यात्रा तसेच येळ्ळूर येथील मळ्यातील यात्रा रद्द करण्याचा निर्णय बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीस ट्रस्टचे आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व ओमिक्रॉनमुळे यावर्षीची मळेकरणी देवीची यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे. तरी भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.