नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावातील समुदाय भवनासाठी निधी मंजूर करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि साई कॉलनी पहिला क्राॅस कंग्राळी (मोठी) येथील नागरिकांतर्फे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना सादर करण्यात आले.
नंदीहळ्ळी ग्रामस्थ व साई कॉलनीतील नागरिकांनी ॲड. मारुती कामाण्णाचे, ॲड. एस. एस. किवडसण्णवर व ॲड. अळगुडी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांची आज शनिवारी त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले.
नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये लग्न समारंभ, बारसे वाढदिवस आदी कोणतेही कार्यक्रम करायचे झाल्यास गावांमध्ये एकही सार्वजनिक भवन अथवा कार्यालय नाही. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होऊन त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी नंदिहळ्ळी गावामध्ये श्री वाकडेवड्डदेवी सर्वधर्म समुदाय भवन (कल्याण मंडप) बांधण्यात यावे. यासाठी आमदार फंडातून 50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा. नंदिहळ्ळी येथील श्री वाकडेवड्डदेवी देवस्थान हे जागृत देवस्थान प्रसिद्ध असून कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र गावालगत देवीच्या मंदिराकडे जाणारा 1 कि. मी. अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे भाविकांना मंदिराकडे ये -जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
तेंव्हा तातडीने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण केले जावे. त्याचप्रमाणे साई कॉलनी पहिला क्रॉस कंग्राळी (मोठी) म्हणजे शाहूनगर शेवटच्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. परिणामी येथील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. तेंव्हा या ठिकाणी ताबडतोब पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी युद्धपातळीवर कूपनलिका (बोरवेल) खोदण्यात यावी. या मागण्या निवेदनात नमूद आहेत.
आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या भेटी प्रसंगी ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी नंदिहल्ली गावातील समुदाय भवनाची गरज, तेथील श्री वाकडेवड्डदेवी देवीच्या मंदिराकडे जाणारा खराब रस्ता तसेच साई कॉलनीतील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबद्दल आमदारांना थोडक्यात माहिती दिली. आमदार हेब्बाळकर यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.