काँग्रेसचे 16 आमदार आमच्या संपर्कात असून भाजप हायकमांडने परवानगी दिल्यास त्यांना पक्षांमध्ये सामील करून घेतले जाईल, अशी माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी देऊन एक नवा बॉम्ब टाकला आहे.
बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेसचे 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत हे खरे आहे. भाजप हायकमांडने संमती दिल्यास त्या सर्वांना पक्षात सामील करून घेतले जाणार आहे.
निधर्मी जनता दलाचे देखील तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. याखेरीज बेळगाव जिल्ह्यातील तीन आमदार आमच्याशी संधान साधून आहेत. त्यापैकी दोघे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहू लागले आहेत. परंतु ते कधीच शक्य होणार नाही. पुन्हा बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच राज्यामध्ये सत्तेवर येईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे कोण कोणता पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार हे सर्वांना समजेल. मला मंत्रिपदाची अजिबात अपेक्षा नाही. मी कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. आमचे हायकमांड अमित शहा आमच्याशी अत्यंत चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे मी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम करतच राहीन, असेही माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.