बेळगाव जिल्ह्यातील 195 माध्यमिक शाळांमधील एसएसएलसीच्या 56 हजार 856 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांच्या 13 लाख रुपये किंमतीच्या 15 हजार प्रति वितरित केल्या जाणार आहेत, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली.
शहरातील संकम हॉटेलच्या सभागृहामध्ये आज सोमवारी सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्यावतीने आयोजित बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील एसएसएलसी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार जारकीहोळी बोलत होते. एसएसएलसीचा निकाल चांगला लागावा यासाठी शिक्षक वर्ग आपल्यापरीने प्रयत्न करत असतातच, त्याच्या जोडीला मुलांना या पुस्तकांची मदत होणार आहे.
शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने यमकनमर्डी मतदारसंघातील शाळांना आमदार निधीतून 4 हजार डेस्कचे वितरण करण्यात आले आहे. कॉम्प्युटर्स देखील देण्यात आले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना 1 लाख फेसमास्क वाटप करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा प्रथम स्थानावर असावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तेंव्हा विद्यार्थ्यांनी वितरीत केलेल्या पुस्तकांचा चांगला अभ्यास करून परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत. कांही राजकारणी आपल्या मुलांना विद्याभ्यासासाठी परदेशात पाठवतात. परंतु मी माझी दोन्ही मुलं राहुल आणि प्रियांका यांना स्थानिक शाळा -कॉलेजमध्येच चांगले शिक्षण घेऊन समाज कार्य करा, असा सल्ला दिला आहे असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार डी. एम चंद्रप्पा, माजी मंत्री एम. बी. पाटील आदींची समयोचित भाषणे झाली. समारंभास आमदार गणेश हुक्केरी, आमदार डाॅ. अंजली निंबाळकर, माजी आमदार अशोक पट्टण, एस. बी. घाटगे, रमेश कुडची, काकासाहेब पाटील, बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी, काँग्रेस नेते गजानन मंगसुळी, बी. सोमशेखर, अशोक पुजारी, महावीर मोहिते, बाळासाहेब पाटील, इस्माईल तमुटगार, विश्वास वैद्य, बसवराज कौजलगी, बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक बसवराज नलतवाड, चिकोडी सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक मोहन हंचाटी आदींसह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.