बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने येत्या 17 जानेवारी 2022 रोजी माजी जवानांकरिता सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदासाठी डीएससी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर डीएससी भरती मेळाव्यासाठी उमेदवाराने फक्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (एमएलआयआरसी) सेवा केलेली असावी. सेनादलाच्या मागील सेवेतून मुक्त होताना आदर्शवत (एक्झाम्पलरी) अथवा अत्युत्तम (व्हेरी गुड) शेरा मिळालेला असावा. मागील संपूर्ण सेवाकाळात दोन पेक्षा जास्त वेळा लाल शाईचा शेरा मिळालेला नसावा.
सेवेत असताना लष्करी कायदा कलम 34, 35, 36, 37 आणि 41 (2) अन्वये शिक्षा झालेली नसावी. गेल्या पाच वर्षात लष्करी कलम 48 अन्वये लाल किंवा काळ्याशार याद्वारे शिक्षा झालेली नसावी. मागील सेवेच्या शेवटच्या 3 वर्षात लाल शाईचा शेरा मिळाला नसावा. उमेदवाराने मागील सेवा काळात तिरंग्याची किमान 5 वर्षे सेवा केलेली असावी. पुनर्रभरतीसाठी नांव नोंदविण्यासाठी मागील लष्करी सेवेतून मुक्त होऊन दोन वर्षे झालेली असावीत.
उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी शेप -1 असली पाहिजे. मागील सेवेतून मिळालेला डिस्चार्ज अर्थात मुक्तता ही सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे अथवा स्व: विनंतीवरून असावयास हवी. उमेदवाराची शैक्षणिक अहर्तता मॅट्रिक पास किंवा त्यावरील शिक्षण अथवा नॉन मॅट्रिकसाठी एसीई lll असावी. उमेदवाराचे वय सोल्जर जनरल ड्युटीसाठी 46 वर्षापेक्षा कमी आणि सोल्जर क्लार्क पदासाठी 48 वर्षापेक्षा कमी असावे.
भरती प्रसंगी उमेदवारांनी ओरिजनल डिस्चार्ज सर्टिफिकेट, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला आदी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती दिवशी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे हजर रहावे, असे आवाहन एमएलआयआरसीच्या ॲडज्युटंटनी केले आहे.