तालिकोट यांची बदली, प्रवीण जैन नुतन तहसीलदार-खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांची अन्यत्र बदली झाली असून त्यांच्या जागी प्रवीण जैन यांनी काल सोमवारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली. मावळत्या तहसीलदार तालीकोटी यांनी आपल्या पदाची सूत्रे जैन यांच्याकडे सुपूर्द केली.
खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात काल मावळत्या तहसीलदार रेशमा तालिकोटी यांना निरोप तर नूतन तहसीलदार प्रवीण जैन यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. बदली निमित्त रेश्मा तालीकोटी यांचा तहसीलदार कार्यालयाच्यावतीने सादिक पाच्छापुरे, तालुका नोकर संघाच्यावतीने अध्यक्ष बी. एम. यळ्ळूर तसेच विविध संघ संघटनांच्या वतीने शाल पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मावळत्या तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी दोन वर्षाच्या ऐन कोरोना काळात तालुक्यातील जनतेकडून जे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे. असेच सहकार्य प्रत्येक तहसीलदारांना मिळाले तर तालुक्याचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, असे मत व्यक्त केले. नूतन तहसीलदार प्रवीण जैन यांनी खानापूर तालुक्यातील जनता चांगली आहे. तेंव्हा सर्वांच्या सहकार्याने तालुक्यात चांगले काम करून दाखवू अशी ग्वाही दिली.
तहसीलदार प्रवीण जैन हे के.ए.एस. अधिकारी असून यापूर्वी त्यांनी कित्तूरमध्ये तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या बेळगावमधील शासकीय बीटीआय प्रशिक्षण केंद्रात ते उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.