Friday, December 20, 2024

/

किल्ल्याची ‘ही’ भव्य प्रतिकृती वेधुन घेतेय साऱ्यांचे लक्ष

 belgaum

दिवाळीच्या कालावधीत बालचमू आणि युवकांकडून किल्ले साकारले जातात हे सर्वश्रुत आहे. तथापि बेळगाव शहरात युवकांचा असा एक गट आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य त्यांचा पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यातील त्यांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास किल्ल्यांच्या प्रतीकृतीतून प्रभावीपणे मांडत असतो.

‘श्री शिवतलवार ग्रुप जुने बेळगाव’ असे या युवकांच्या गटाचे नांव असून त्यांनी जवळपास 3 महिन्यांच्या परिश्रमानंतर यंदा साकारलेली ऐतिहासिक किल्ले श्री प्रतापगडाची हुबेहूब भव्य प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.

शहरातील जुने बेळगाव, मेन रोड येथील श्री शिवतलवार ग्रुप या युवकांच्या या गटाने 2020 -21 सालातील दीपावलीनिमित्त गौरवशाली इतिहास असणाऱ्या किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती साकारली आहे. सदर उंचीला 10 फूट असणारी ही प्रतिकृती 350 चौरस फूट जागेमध्ये उभारण्यात आली आहे. यासाठी शाडू आणि मातीचा वापर करण्यात आला आहे. श्री शिवतलवार ग्रुप मधील 10 युवकानी आपले काम सांभाळून हा किल्ला उभारला आहे.

दिवसभर स्वतःचे काम सांभाळणे आणि रात्री किल्ल्याच्या प्रतिकृतीचे काम करणे. या पद्धतीने गेले जवळपास 3 महिने परिश्रम घेऊन सदर युवकांनी अभ्यासपूर्वक प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. श्री शिवतलवार ग्रुप हा गेल्या 2012 पासून पासून यापद्धतीने जिंजी, वेल्लोर, देवगिरी अशा विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत असून यंदाही त्यांनी आपली परंपरा कायम ठेवली आहे.Pratap gad fort

सदर भव्य प्रतिकृतीसंदर्भात श्री शिवतलवार ग्रुपच्या मंगेश खानापूरकर याने बेळगाव लाईव्हला अधिक माहिती दिली. यंदा साकारण्यात आलेल्या प्रतापगडाच्या प्रतिकृतीमध्ये अफजल खान वधाचा संपूर्ण इतिहास उभा करण्यात आला आहे. किल्ले प्रतापगडाची सर्व प्रमुख वैशिष्ट्ये या प्रतिकृतीमध्ये दाखविण्यात आली आहेत. या खेरीज छ. शिवाजी महाराजांनी जेंव्हा चंद्रराव मोऱ्यांकडून जावळी खोरे जिंकले त्यावेळी जावळी सोबतच चंद्ररावांचे राज्य ज्या सहा अन्य खोऱ्यांमध्ये पसरले होते त्या प्रमुख खोऱ्यांवर देखील महाराजांनी आपले वर्चस्व मिळवले. त्यासाठी जावळीसह जोहर खोरे, जांबूळ खोरे, कोयना खोरे आदी संबंधित सहाही खोरी या प्रतिकृतीमध्ये दाखवण्यात आली आहेत. याखेरीज अफजल खानाची छावणी ज्याठिकाणी होती ते पारगाव ज्याला पार्वतीपूर असेही म्हंटले जाते तेदेखील दाखवण्यात आले आहे.

एकंदर प्रतापगडाची ही भव्य प्रतिकृती सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. किल्ल्याची ही प्रतिकृती बेळगावच्या इतिहासातील सर्वात उंच आणि मोठी प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते.

ही प्रतिकृती पाहण्यासाठी वाढती गर्दी होत असून येत्या 20 जानेवारीपर्यंत किल्ले प्रतापगडाची ही भारदस्त लक्षवेधी प्रतिकृती सर्व शिवभक्तांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. तरी शिवभक्तांसह नागरिकांनी प्रतापगडाच्या या प्रतिकृतीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन श्री शिवतलवार ग्रुप, जुने बेळगाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.