बेंगलोर -निजामुद्दीन या मार्गावर राजधानी एक्सप्रेस रेल्वेची दैनंदिन सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नैऋत्य रेल्वेने भारतीय रेल्वे बोर्डाकडे पाठविल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ही रेल्वे व्हाया हुबळी, बेळगाव, पुणे, भुसावळ यामार्गे धावण्याची शक्यता असल्यामुळे याचा फायदा बेळगावच्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नैऋत्य रेल्वेकडे बेंगलोर -निजामुद्दीन या मार्गावर राजधानी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. दिल्लीला प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ही राजधानी एक्सप्रेस दैनंदिन सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
त्यांच्या प्रस्तावाची दखल घेत नैऋत्य रेल्वेने भारतीय रेल्वे बोर्डाकडे राजधानी एक्सप्रेसचा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्रीय संसदीय मंत्र्यांनी प्रस्ताव दिल्यामुळे राजधानी एक्सप्रेस लवकरच सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
सदर राजधानी एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाल्यास मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला पहिली तर भुसावळ विभागाला दुसरी राजधानी एक्सप्रेस मिळणार आहे.
या एक्सप्रेसमध्ये 18 एलबीएच कोचचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही रेल्वे एकूण 2,650 कि. मी. अंतराचा प्रवास करणार आहे. राजधानी एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्यास बेळगावच्या प्रवाशांना दिल्ली व बेंगलोरला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.