कोरोनाच्या तिसर्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व पोलिसांची आरटी -पीसीआर तपासणी करून घेणे सुरू आहे. पहिल्या दिवशी 11, दुसऱ्या दिवशी 40 तर आता कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या पोलिसांची संख्या 106 वर पोहोचली आहे. मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरगुती विलगीकरणाद्वारे उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली आहे.
कोरोना नियमावलीची कटाक्षाने अंमलबजावणी, फिर्याद स्वीकारण्यासह इतर कारणांवरून पोलिसांचा नागरिकांशी संपर्क येतो. अशा वेळी पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा संभव आहे. या पार्श्वभूमीवर एकूण 1,400 हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरटी -पीसीआर चांचणी करण्यात आली होती.
त्यापैकी 106 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी काहींमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, तर बहुतांश जणांमध्ये ही लक्षणे आढळलेली नाहीत.
कोरोना बाधित पोलिसांचे घरातच विलगीकरण करून उपचार केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही भीती मनात बाळगण्याची गरज नाही पोलीस खात्याकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली आहे.
एखाद्यावेळेस आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास संबंधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले आहे.