बेळगाव -खानापूर मार्गावरील गांधीनगर येथील हनुमान युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल मंगळवारी श्रमदान करून स्वखर्चाने खड्डे बुजवून आपल्या नगरानजीकच्या बेळगाव -खानापूर रस्त्याची डागडुजी केली.
गांधीनगर येथील बेळगाव खानापूर रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने किरकोळ अपघात घडत असतात. दिवसेंदिवस खड्ड्यांमुळे हा रस्ता अधिकच धोकादायक बनू लागला आहे.
याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे गांधीनगरातील हनुमान युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच काल मंगळवार श्रमदानाने रस्त्यावरील धोकादायक मोठे खड्डे स्वखर्चाने बुजविले. मंगलदास गोसावी, किरण अष्टेकर व मोहनदास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना बेळगाव ते खानापूर रस्ता बऱ्याच ठिकाणी खराब झाला आहे. तेंव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्यावरील धोकादायक खड्डे तात्काळ बुजवावेत.
या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन आज हनुमान युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून रस्त्यावरील खड्डे बुजविले ही प्रशंसनीय बाब असली तरी संबंधित काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे आहे. तेंव्हा येत्या महिन्याभरात सदर खात्याने या रस्त्याची चांगल्याप्रकारे दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अन्यथा रस्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भरमानी पाटील यांनी दिला.