सांबरा येथील सिद्धकला क्रिकेट क्लबतर्फे आयोजित आणि आमदार पुरस्कृत ‘आमदार चषक -2022’ या मर्यादित षटकांच्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सलमान स्पोर्ट्स पंत बाळेकुंद्री या संघाने हस्तगत केले. अंतिम सामन्यात सलमान स्पोर्ट्सने प्रतिस्पर्धी चांगळेश्वरी स्पोर्टस येळ्ळूर संघावर 52 धावांनी विजय मिळविला.
सांबरा गावच्या मैदानावर झालेला स्पर्धेचा अंतिम सामना दोन डावात खेळवण्यात आला. पंतबाळेकुंद्री संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 8 षटकात 88 धावा काढल्या. प्रत्युत्तरदाखल येळ्ळूर संघाचा डाव 72 धावात संपुष्टात आला. या पद्धतीने 16 धावांची आघाडी घेताना दुसऱ्या डावात सलमान स्पोर्ट्स पंतबाळेकुंद्री संघाने 96 धावा फटकाविल्या. परिणामी विजयासाठी 113 धावांचे उद्धिष्ट घेवून मैदानात उतरलेला येळ्ळूर संघ केवळ 60 धावा जमवू शकला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेता संघांना रोख रक्कम आणि चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचे नाणेफेक सामाजिक कार्यकर्ते शिवराज जाधव आणि अब्दुल बागवान यांच्या हस्ते तर उपांत्यफेरीच्या सामन्याचे नाणेफेक देवस्थान कमिटी अध्यक्ष राजू देसाई आणि माजी ग्रा. पं. अध्यक्ष विलास खनगावकर यांच्या हस्ते करण्यात आली.
मालिकावीरासाठी प्रकाश पाटील (हुबळी) यांनी पुरस्कृत केलेली नवी कोरी सायकल शकीब लंगोटी (पंतबाळेकुंद्री संघ) याने पटकावली. ग्रा. पं. सदस्य नितीन देसाई पुरस्कृत उत्कृष्ट संघ पुरस्कार मराठा स्पोर्ट्स बसरीकट्टी संघाला मिळाला. विशाल नागन्नावर पुरस्कृत उत्कृष्ट झेल पुरस्कार परशुराम कांबळे (सांबरा संघ), ता पं सदस्य काशिनाथ धर्मोजी पुरस्कृत उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार अभिजित (येळ्ळूर)याने तर लक्ष्मण तिप्पनाचे पुरस्कृत उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार अझहर
(पंतबाळेकुंद्री संघ) याने तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षक पुरस्कार सुशांत कडोलकर (हिंडलगा संघ) यांने हस्तगत केला. या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
क्वालिटी डेव्हलपरच्यावतीने प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कारासाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले होते. माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांनी स्वागत करून आभार मानले. प्रकाश पाटील, यल्लप्पा हरजी आणि प्रकाश करेलकर यांनी सामन्यांच्या समालोचकाची भूमिका चोख पार पाडली.
मल्लाप्पा कांबळे आणि मारुती पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रकाश चौगले, अरुण जत्राटी, विशाल नाईक, विजय नायर, ईश्वर कांबळे, यल्लाप्पा कांबळे, नितीन देसाई, मोहन हरजी, सलीम काजी, सुनील नायर, श्रीकांत सनदी, संतोष पगडी, सुमित नागन्नावर, महेश गिरमल आदीनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.