बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहे. दरम्यान मागील 45 दिवसात मंदिर सुरू असताना देवस्थान मंदिराच्या दानपेटी मध्ये 1 कोटी 18 लाख रूपये देणगी जमा झाली आहे.
कोरोना संक्रमणामुळे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दोन वर्षे बंद होते. संसर्ग कमी झाल्यानंतर प्रशासनाने भाविकांना दर्शनाची संधी दिली. त्यावेळी केवळ एकाच महिन्यात मंदिराला एक कोटी, वीस लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली होती.
गतवर्षी नोव्हेंबर अखेरीस 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत मंदिरात ठेवलेला दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. आता 28 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर पर्यंत ठेवलेल्या दानपेट्या 45 दिवसानंतर उघडण्यात आल्या. देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी, धर्मादाय खाते तहसीलदार, आणि सौंदत्ती पोलिसांच्या उपस्थितीत दानपेटी उघडण्यात आल्या.दानपेटीतील रक्कम मोजण्याचे काम तीन दिवस सुरू होते.
मंदिराचे 80 कर्मचारी आणि सिंडिकेट बँकेच्या आठ कर्मचार्यांनी ही रक्कम मोजली. मोजणी पूर्ण झाल्यानंतर दानपेटीत एक कोटी 18 लाख 43 हजार 441 रुपये रोख रक्कम देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. यासह 17 लाख 39 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने आणि दोन लाख वीस हजार 332 रुपये किमतीचे चांदी देणगी स्वरूपात मिळाली आहे.
यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसाया हिरेमठ, कार्यकारी अधिकारी रवी कोठारगस्ती व धर्मदाय खात्याचे तहसीलदार आदी उपस्थित होते.