कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शालेय वर्गाना सुट्टी जाहीर केली असली तरी यामुळे भविष्यातील प्रत्यक्ष घेतल्या जाणाऱ्या वर्गांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा ऑनलाईन क्लासेस सुरू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे शिक्षण पद्धती बिघडवणाऱ्या या प्रतिकूल परिस्थितीला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न शिक्षक वर्गाला पडला नाही.
सध्याच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांकडे घरात उच्च गतीची इंटरनेट सेवा उपलब्ध असली तरी त्यामुळे गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्याचे आव्हान मुलांवर मोठा परिणाम करू शकते. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांकडून मिळणारी प्रत्यक्ष प्रेरणा मार्गदर्शनाचा अभाव, स्वयंशिस्त आणि अभ्यासाबाबत आसक्ती, या सर्वात मोठ्या समस्यांना मुलांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तविली जात आहे.
या संदर्भात बोलताना बी. के. मॉडेल इंग्लिश माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शारीरिक मानस तज्ञ डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी कोरोना महामारीमुळे अलीकडे जी ऑनलाईन शैक्षणिक वर्ग घेण्याची प्रथा सुरु झाली आहे त्यामुळे दर्जात्मक शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. ऑनलाईन क्लासेस दरम्यान जर पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले नाही तर मुले या क्लासेसकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. कांही मुले फक्त हजेरी भरावी म्हणून ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभाग दर्शवतात, असे डॉ कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेनंतर जेंव्हा शाळा पुनश्च सुरू झाल्या त्यावेळी बहुसंख्य विद्यार्थी शाळेतील वर्गात प्रत्यक्ष हजेरी लावताना अस्वस्थ दिसत होते. शाळेतील वर्गात प्रत्यक्ष हजेरी लावून शिकणे त्यांच्यासाठी अवघड जात असल्याचे दिसून येत होते. परिणामी अनेक विद्यार्थी शाळेला दांडी मारू लागल्यामुळे शिक्षकांना नाईलाजाने त्यांच्या बाबतीत कडक धोरण अवलंबावे लागले, असेही त्यांनी सांगितले.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्राथमिक शिक्षण हा पाया असतो. मात्र या कालावधीत ऑनलाइन शिक्षणामुळे पालक वर्ग अभ्यासक्रमातील टाचण काढून आपल्या मुलाचे नोट्स लिहिण्यात व्यस्त असतात, तर मुले जंक फूड खाण्यात आणि कार्टून बघण्यात गर्क असतात.
या पद्धतीने पालक वर्ग स्वतःच्या हाताने आपल्या मुलांचा शैक्षणिक पाया कमकुवत करत आहेत असे सांगून सध्या जेंव्हा शाळेतील वर्गात शिक्षक मुलांना प्रत्यक्ष शिक्षणाची (ऑफलाइन क्लासेस) गोडी लावण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्याची खंत मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.